वाघोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ! लिनोवो कंपनीचे लॅपटॉप चोरणारे तिघे अटकेत; २४४ लॅपटॉप जप्त, पोलिसांकडून अवघ्या ३ दिवसात गुन्हा उघडकीस

वाघोली पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर काहीच दिवसात अर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअर हौसिंग या गोदामातून लिनोवा कंपनीचे १ कोटी ९ लाखांच्या २८० लॅपटॉपची चोरी झाली होती. वाघोली पोलिसांनी तीन दिवसात हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले. या गोदामात काम करणार्‍या एका हेल्परने साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

सुरेश महादेव कुमार (वय ३५,), शिवाजी जगन्नाथ वसु (वय २७), कुमुद रंजन झा (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अर्कलाईन वेअर होसिंगमधून लॅपटॉप चोरीला गेल्याचा गुन्हा १५ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आला होता. याबाबत वेअर हौसिंगचे व्यवस्थापक बाळकृष्ण सखाराम राऊत यांनी फिर्याद दिली होती. सुरेश कुमार हा त्यांच्या कंपनीत दोन महिन्यांपासून कामावर येत होता. कमी पगार असल्याने कुमार याने शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी काम सोडले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. त्यामुळे या चोरीमागे सुरेश कुमार याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. तपास चालू असताना पोलीस अंमलदार अजित फरांदे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एम आय डी सी येथे पथक पाठविण्यात आले. त्यांनी तिघा जणांना ताब्यात घेतले. सुरेश कुमार याने त्याचा साथीदार तेजप्रकाश याच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तेजप्रकाश फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाची साखळी जोडून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ९ लोकांकडून लिनोव्हा कंपनीचे २४४ लॅपटॉप, २ पिकअप व्हॅन व ३ मोबाईल असा १ कोटी १ लाख २५ हजार रुपयांचा माल हस्तगत केला. न्यायालयाने तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश खटके अधिक तपास करीत आहेत. पोलीस अंमलदार अजित फरांदे व अमोल ढोणे यांनी विशेष मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, योगेश खटके, लोणीकंद पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार अजित फरांदे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, वाघोली पोलीस ठाण्याकडील हवालदार संदीप तिकोणे, पोलीस अंमलदार विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडु, गणेश आव्हाळे, दीपक कोकरे, प्रितम वाघ, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.