
पाच कामगारांचा मृत्यू, अनेकजण जखमी, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट

भंडारा – भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणी मध्ये मोठा स्फोट झाला आहे. एक इमारत पूर्णतः उडाली असून ५ कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत छत कोसळून १३ ते १४ कामगार अडकल्याची माहिती समोर आली होती. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार आयुध निर्माणी जवाहर नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमाराास एक स्फ़ोट झालेला असून त्यामध्ये काही काम करणारे कर्मचारी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आले आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान या दुर्घटनेत पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘एक्स'(ट्विटर) वर दिली आहे.
जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) २७ जानेवारी २०२४ मध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यातएक कर्मचारी ठार झाला होता. कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला होता. आता परत वर्षानंतर पुन्हा अपघात झाला आहे.









