
राज्य सरकारने केली मोठी घोषणा, कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

मुंबई – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं मदत पॅकेज जाहीर केलं आहे. तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं हे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.७) बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर बागायतसाठी ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहे. तसेच माती खरडवून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी ४७ हजार रुपये तर दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच गाळात गेलेल्या विहिरीसाठी ३० हजार रुपये टंचाईच्या सर्व सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच दोन एकर मदतीऐवजी तीन एकरपर्यंत मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी आधीच शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं. त्सेच्झ रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये अधिकचे देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे आपल्या पिकांवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम असते. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी करण्याची शक्यताही संपली. अशा परिस्थितीत शंभर टक्के नुकसान भरपाई कोणीच देऊ शकत नाही. मात्र भविष्यात शेती आणि शेतकरी उभा राहिला पाहिजे, यासाठी आम्ही जास्तीत जास्त मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये २५३ तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
पिकांच्या बाबतीत ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज राज्य सरकारकडून दिले जाईल. यातील जास्तीत जास्त पैसा हा दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पीक नुकसानीसाठी जवळपास १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत करत आहोत. ज्या गोष्टी नियमात बसत नाहीत तिथे सीएसआरच्या माध्यमातून मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.









