ब्रेकिंग! माजी मुख्यमंत्र्यांचे दीर्घ आजाराने निधन

रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास, केंद्रातही उमटवला ठसा, सात दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

रांची – झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते आणि बऱ्याच काळापासून आजारी होते. शिबू सोरेन व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती अनेक दिवसांपासून गंभीर होती. त्यांना एका महिन्याहून अधिक काळ राष्ट्रीय राजधानीतील श्री गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी एक्सवर याची माहिती दिली आहे. ‘आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहे. आज मी शून्य झालो आहे…’ दरम्यान, सर गंगा राम रुग्णालयाने माहिती दिली की शिबू सोरेन यांना आज सकाळी ८:५६ वाजता मृत घोषित करण्यात आले. शिबू सोरेन हे गेल्या ३८ वर्षांपासून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते होते आणि पक्षाचे संस्थापक संरक्षक म्हणून ओळखले जातात. शिबू सोरेन यांचा जन्म ११ जानेवारी १९४४ रोजी रामगडच्या नेमरा गावात झाला. १९६० च्या दशकात त्यांनी आदिवासींच्या हक्कांचे आणि जल-जंगल-जमिनीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू केला. १९७० च्या दशकात त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ची स्थापना केली. त्यांचे मुख्य उद्दिष्ट वेगळ्या झारखंड राज्याची मागणी करणारी चळवळ चालवणे होते. या चळवळीत त्यांनी आदिवासींच्या जमीन हिसकावणे, शोषण आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि दीर्घ संघर्षामुळे १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड राज्याची स्थापना झाली. राज्याच्या स्थापनेनंतर शिबू सोरेन २००५, २००८ आणि २००९ मध्ये तीनदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या कार्यकाळात झारखंडमधील अनेक प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळालं. त्यांच्या कारकीर्दीवर काही वादग्रस्त छाया आल्या, तरीही त्यांनी आपला राजकीय वारसा कायम राखला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर अनेक प्रमुख नेत्यांनी शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने सात दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे.