उसळी! आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठे फेरबदल

आता १० ग्रॅम सोन्याची किंमत पाहून धक्काच बसेल, चांदीही चकाकली, दिवळीत किंमत उतरणार की चढणार?

मुंबई – सणासुदीत अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. गणेशोत्सवनंतर आता नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सारखे सण अगदी काही दिवसावर येऊन ठेपले आहे. मात्र यंदा ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्यासह चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.

सोन्यासह चांदी दराने मागील काही दिवसात नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विना जीएसटी १ लाख १० हजार ३०० रुपये प्रति तोळा इतका आहे. हाच दर ८ सप्टेंबरला १ लाख ८ हजार रुपये इतका होता. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १५ सप्टेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १०९,७९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १००,६४१ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १२८,९४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,२८९ रुपये आहे. या आठवड्यात सराफ बाजारात सोने दरात जवळपास २४०० रुपये (विनाजीएसटी) प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली. तर चांदी दरात तब्बल ५ हजार रुपये (विनाजीएसटी) प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसून येत आहे. याचाच प्रत्यय गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या दर वाढीतून मिळाला. घटस्थापनापूर्वीच गुंतवणूकदारांचा वाढता कल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली अनिश्चितता तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे मौल्यवान सोने व चांदीच्या धातूंना मागणी वाढली आहे. मात्र, आता सोन्याच्या तेजीला ब्रेक लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याचे दर US Fed च्या बैठकीत होणाऱ्या निर्णयांवर अवलंबून राहणार असून या बैठकीनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जागतिक परिस्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेचाही सोन्याच्या दरावर परिणाम होतो. सध्या अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगाची चिंता वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आणि सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.