उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीने राखीचा सण साजरा केला आणि ते जेवून झोपले. पण त्या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकच शोककळा पसरली. विशेष म्हणजे पूजा हिच एक वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. तिचा नवराही कामानिमित्त बाहेर असतो.
२१ वर्षीय पूजा आणि १५ वर्षीय विकास यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केल्यानंतर त्यांनी पनीर आणि समोसा खाल्ला. नेहमी प्रमाणे ते रात्री झोपायला गेले. पण अचानक त्यांची रात्री ३ वाजता प्रकृती खराब झाली. आईने शेजारच्या मदतीने त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्या दोघांनी शेवटचा श्वास घेतला. आईने पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पूजा एक महिन्यापूर्वीच तिच्या घरी आली होती. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधली आणि भावाने बहिणीचे रक्षण करण्याचं वचन दिलं. यावेळी विकासने बाजारातून पनीर आणि समोसे आणले होते.
जे दोन्ही भाऊ बहिणींनी खूप आवडीने खाल्ले आणि नंतर दोघेही झोपी गेले. पहाटे तीनच्या सुमारास दोघांनाही अचानक उलट्या आणि जुलाब सुरू झाले. घाबरलेली आई कशीतरी जवळच्या बंगाली डॉक्टरला पोहोचली. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. मुलगी आणि मुलाला अचानक एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे आईवर दु:खाच डोंगर कोसळलंय. आई वडील पूर्णपणे खचून गेले आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण लक्षात येत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांनाची चौकशी केली असून शवविच्छेदनासाठी पाठवलंय. तर प्रथमदर्शनी दोघांचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्यामुळे झाल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे. पीएम रिपोर्ट आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट, असं पोलिसांनी सांगितलंय.