मृत्यूचे कारण गुलदस्त्यात, तीन दिवस बंद होते घर, रिपोर्टनंतर होणार खुलासा
लोणी काळभोर – कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील गुजर वस्ती परिसरात आज सोमवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
संतोष लेकनाथ बट्टाराय असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा नेपाळचा असून कामानिमित्त तो कदमवाकवस्ती येथे राहत होता. तो जिओ मार्टमध्ये काम करत होता. गेले तीन दिवस संतोष याच्या घराचा दरवाजा बंद होता. तसेच त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली जाधव, पोलिस हवालदार तानाजी भापकर व महिला पोलीस अंमलदार रूपाली कदम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता, तो घरात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी संतोषच्या नातेवाईकांना संपर्क साधत याबाबत माहिती दिली आहे. पण तीन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने मृत्यू नेमका कधी झाला हा प्रश्न अनुत्तरित आहे.
पोलिसांनी संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संतोष यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.