चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे बीआरटी मार्गात आज दि.२९ जुलै रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास बीएमडब्ल्यू कार आणि स्कुल बसची समोरासमोर धडक झाली. यात कारचालक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले. यश मित्तल असे जखमी कार चालकाचे नाव आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश मित्तल हा त्याच्या ताब्यातील कार घेऊन ऑटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गातून जात होता. त्याचवेळी पोदार इंटरनॅशनल स्कूल संस्थेची स्कुलबस बीआरटी मार्गातून समोरून येत होती. कार आणि स्कुल बसची समोरासमोर धडक झाली. यात कारचे तसेच स्कुलबसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बीआरटी मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील विविध मार्गांवर बस रॅपिड ट्रांजिट (बीआरटी) कॉरिडॉर उभारले आहेत. पीएमपीएमएल बससेवा अधिक सक्षम होण्यासह प्रवाशांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी या कॉरिडॉरची निर्मिती केली. केवळ पीएमपीएमएल बसलाच या बीआरटी मार्गात प्रवेश आहे. मात्र, तरीही इतर वाहनांची या मार्गात घुसखोरी होते. परिणामी अपघात होतात. आटो क्लस्टर येथील अपघातात अशाच पद्धतीने स्कूल बस आणि कारचालकाने घुसखोरी केली असल्याचे समोर आले आहे.