
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. धारशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीकडून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानं शिवसेना शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली होती. कोणत्याही शिवसैनिकाला तिकीट द्यावं अशी भूमिका घेतली होती. मात्र, अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम राहीली आहे. त्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीय.

दरम्यान, कालच भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होतीय यावेळी त्यांनी मी वेगळ्या कामासाठी त्यांची भेट घेतली असल्याचे सांगितले होते. मी कट्टर शिवसैनिक असल्याचे आंधळकर म्हणाले होते. मात्र, आज त्यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तसेच धाराशिव लोकसभेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, या मतदारसंघातून कोणत्याही शिवसैनिकाला तिकीट द्यावे, कापण हा पारंपारिक शिवसेनेचे मतदारसंघ असल्याचे आंधळकर म्हणाले होते.

भाऊसाहेब आंधळकर हे आता वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. भाऊसाहेब आंधळकर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नोकरी सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. 2011 साली त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर राज्यातील राजकीय घडामोडीनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख होती. पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. माजी विधानसभा सभापती वसंत डावखरे यांच्यासोबतचा त्यांचा वाद गाजला होता. आंधळकर यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला होता. तसेच आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. दरम्यान, आंधळकर यांचे नाव सातत्यानं चर्चेत असते. एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे.








