भाजपाचे युवा खासदार या गायिकेशी अडकणार विवाहबंधनात

बेंगलोर – भाजप खासदार तेजस्वी सूर्या हे भाजपच्या सर्वात तरूण खासदारांपैकी एक आहेत. ते दक्षिण बेंगळुरूचे खासदार आणि बीजेपी युवा मोर्चाचे अध्यक्ष देखील आहेत. तेजस्वी सूर्या आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण आता सुर्या लवकरच विवसहबंधनात अडकणार आहेत.

तेजस्वी सूर्या लवकरच शिवश्री स्कंदप्रसादशी लग्न करणार आहेत. शिवश्री ही लोकप्रिय गायिका व भरतनाट्यम नृत्यांगना आहे. ३४ वर्षीय तेजस्वी सूर्या व शिवश्री स्कंदप्रसाद यांचे लग्न ४ मार्च २०२५ रोजी बंगळुरू होणार आहे. त्यांचा साखरपुडाही झाला आहे. त्यांच्या पत्नीबद्दल बोलायचे झाल्यास शिवश्री स्कंदप्रसादने बायोइंजिनियरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमए आणि मद्रास संस्कृत कॉलेजमधून संस्कृतमध्ये एमए पूर्ण केले आहे. शिवश्रीचे युट्यूबवर दोन लाख सबस्क्रायबर्स आहे. तिने कन्नड भाषेतील ‘पोन्नियिन सेल्वन: भाग 2’ मधील ‘वीरा राजा वीरा’ गाणं गायलं होतं. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. दरम्यान तेजस्वी अथवा शिवश्री यांच्याकडून अद्याप अधिकृतरित्या लग्नाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

तेजस्वी सूर्या हे भाजपाचे ‘फायर ब्रँड’ नेते आहेत. ते त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९० रोजी कर्नाटक येथील चिकमंगळूर जिल्ह्यात झाला. अभाविपमधून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते पहिल्यांदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते, २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले.