
तब्बल इतक्या वर्षानंतर भाजपाची सत्ता, माजी मुख्यमंत्री केजरीवाल पराभूत, काँग्रेसचा भोपळा

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. सलग दोन वेळा विजय मिळवलेल्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला तब्बल २७ वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी भाजप सर्वात जास्त ४७ जागांवर आघाडीवर आहे.

आपला यंदा विजयीची हॅट्रीक करण्याची संधी होती. पण त्याला मोठे अपयश आले असून सत्ताधारी आम आदमी पार्टीला फक्त २३ जागांवर आघाडी घेता आली आहे. मुख्यमंत्री अतिशी देखील पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही. आपला दारू घोटाळ्याचा फटका बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. निवडणूकाच्या काही दिवस आधी सात आमदारांनी दिलेला राजीनामा आणि भाजपात केलेला प्रवेश देखील आपची पिछेहाट होण्यात महत्वाचा ठरला आहे. विशेष म्हणजे यंदा भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी कोणताही चेहरा दिलेला नव्हता, ही चाल त्यांच्यासाठी फायद्याची ठरली. याआधी भाजपाने किरण बेदी यांना देखील मुख्यमंत्री म्हणून प्रमोट केले होते. पण यंदा भाजपाने जोरदार मुसंडी मारत आपला धुळ चारली आहे. आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी मार्लेना पिछाडीवर पडले आहेत. जंगपूरा मतदारसंघातून दिग्गज नेते मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. अशातच दिल्लीत भाजपने सत्ता स्थापन केली तर मुख्यमंत्री पदासाठी दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता, खासदार मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिधुडी यांची नावे आघाडीवर आहेत.
दुसरीकडे सलग १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेससाठी दिल्ली विधानसभा निवडणूक मोठा धक्का ठरला आहे. कारण यंदा संपूर्ण निवडणुकीत काँग्रेसचा काहीच प्रभाव दिसून आलेला नाही. त्यांना पुन्हा एकदा दारूण पराभव पहावा लागला आहे.









