
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचे नाव थेट दिल्लीतून फिक्स, शिंदे गटाची तलवार म्यान, रायगडही जाणार?

मुंबई – नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद हे भाजपकडेच राहणार आहे. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून मोठी रस्सीखेंच सुरू होती. पण अखेर भाजपाने शिंदे गटाला दणका दिला आहे.

मागील काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. १८ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. शिंदे गट हा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होता. पण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार आहे, मात्र रायगडचा तिढा अजून कायम आहे, अशी माहिती भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न कायम आहे. रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून सोडवावा, असे आदेश दिल्लीतून देण्यात आले आहेत. नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे व शिंदे गटाचे दादा भुसे हेही होते. पण आता थेट दिल्लीतून आदेश आल्याने शिंदे गटाने आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे दादा भुसे आता काय भूमिका घेतात ते पाहावे लागणार आहे. तर दुसरीकडे रायगड मध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे व शिवसेनेचे भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद सुरु आहे. नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन व रायगड मध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महायुतीत हा वाद उफाळून आला होता.









