
संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना सादर, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, दिल्लीतून निर्णय होणार?

दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.

जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा ‘कार्य विस्तार अभियान’ संदर्भातील विशेष पुस्तिका पंतप्रधानांना सादर केली. या पुस्तकात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनकार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला-युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात आदरणीय मोदीजींकडून रविंद्र चव्हाण यांना मार्गदर्शन लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या संदर्भात चव्हाण यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय की, विकासपुरुष, राष्ट्रसेवक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच झालेली ही सदिच्छा भेट दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरली. जानेवारी ते जून या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल यावेळी आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हाती सुपूर्द केला. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात आदरणीय मोदीजींकडून मार्गदर्शन लाभले. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी भाजपकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस, ठाकरेंच्या दिग्गज नेत्यांना गळाला लावले जात आहे. तसे अनेक पक्षप्रवेश आगामी काळात होणार आहेत.
मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं किंवा काढायचं हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र यासाठी दिल्लीत चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.









