(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नागपंचमी निमित्ताने जामखेडच्या नागेश्वराची यात्रा असते. या यात्रेत गुंड निलेश घायवळ आणि भाजप आमदार राम शिंदे एकत्रित दिसून येत आहेत. निलेश घायवळवर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता चर्चा सुरु आहेत. यामुळे विरोधकांना महायुतीवर पुन्हा टीका करण्यास आयतं कोलीत मिळाले आहे. मागेच निलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विट केला होता. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही समाजमाध्यमावर निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरतानाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रिल्स तयार करतो, त्याच्या सोबत इतर गुंड देखील आहेत. हे कशी काय एवढी हिंमत करतात? मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो हे कसं काय शक्य होतंय? गुंडांना सोबत घ्यायची वेळ मुख्यमंत्र्यांना लागत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा थराराचा पुण्यात इतिहास असून दोन्ही टोळ्यांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी पुण्यात अनेक कारनामे केले आहेत.