भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा अखेर शरद पवार गटात प्रवेश ;वडिलांच्या आधी लेकीनेच भाजप सोडल्याचं केलं जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जावंच लागेल असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. मात्र, हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी आपण आधीच भाजपा सोडल्याचं जाहीर केलं आहे. ‘मी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे’ असं देखील त्यांनी सांगितलं आहे. अंकिता पाटील म्हणाल्या की, ‘हर्षवर्धन पाटील साहेब जे काही आहे ते पत्रकार परिषदेत बोलतील. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करावा, याबाबात साहेबच स्पष्टीकरण देतील.

त्या पुढेच म्हणाल्या, भाजपच्या सर्व पदांचा मी आज राजीनामा दिला आहे. विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अंकिता पाटील म्हणाल्या. तसंच हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असंही त्या म्हणाल्या. त्यांनी भाजपाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे असं माध्यमांना हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका जाहीर करण्याआधी सांगितलं.