महाराष्ट्रात कोणालाच जमले नाही ते भाजपाने करुन दाखवले

महाराष्ट्रात भाजपाची ऎतिहासिक कामगिरी, विरोधकांबरोबरच शिंदे आणि अजित पवारही अस्वस्थ?

मुंबई – भारतीय जनता पक्षाने अखेर महाराष्ट्रातील सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. राज्यात अजूनही कोणत्या पक्षाला एवढा टप्पा पार करता आलेला नाही. याशिवाय पक्षाने त्यांच्या विधानसभा निवडणूकीतील मतांची बरोबरी देखील केली आहे.

भाजपाने काही महिन्यापुर्वी सदस्य नोंदणी अभियान सुरु केले होते. आधी राज्यात एक कोटी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. पण हे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे पाहून भाजपने ते लक्ष्य ५० लाखांनी वाढवून दीड कोटींवर नेले. आता हे लक्ष्य देखील पूर्ण झाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कामगिरीबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे ते म्हणाले मला अभिमान आहे, १८५६ कार्यकर्त्यांनी १ हजार सदस्य संख्या पूर्ण केली. १७२६ कार्यकर्त्यांनी ५०० सदस्य संख्या केली.या अभियानात युवा, लाडक्या बहिणी, आदिवासी भागात, बौध्द समाजात सर्वच समाजाने सहयोग घेतला आहे. असा कोणताही समाज नाही ज्याने भाजपचं सदस्यता घेतली नाही. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज लोकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली आहे. भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत १ कोटी ४९ लाख ६६ हजार ५७७ मते मिळाली होती. तर विधानसभेला १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते मिळाली होती. अर्थात यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांचाही वाटा आहे. भाजप हा ‘जगातला सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणवून घेत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही ही सदस्य संख्या जास्त असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो आहे. विशेष म्हणजे राज्यात कोणत्याच पक्षाला भाजपा एवढी सदस्य संख्या नोंदवता आलेली नाही.

भाजपच्या या दीड कोटी सदस्य नोंदणीची शिवसेना, राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. अगोदरपासून सर्व पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणूका स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. पण युती राहिल्यास भाजपा स्वतःकडे जास्त जागा ठेवून मित्र पक्षाला मोजक्याच जागा देताना सदस्य नोंदणीचा दाखल देऊ शकतो, त्यामुळे विरोधकांबरोबर भाजपाचे मित्रपक्ष देखील अस्वस्थ आहेत.