
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर महायुतीला मिळालेलं मोठं यश आणि त्यानंतर झालेला मंत्रिमंडळाचा विस्तार या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्यानंतर आता सर्वच बड्या राजकीय पक्षांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. यातील भाजपामध्ये नवीन प्रदेशाध्यक्षाचे नाव निश्चित करण्यात आलेले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले. त्यामुळेच बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपात एक व्यक्ती एक पद असे धोरण आहे. त्यामुळे बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावे लागणार आहे. येत्या १२ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन आहे. या अधिवेशनात नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय विरोधक असणारे रविंद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. रविंद्र चव्हाण हे २००७ मध्ये भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याचवेळी ते स्थायी समितीचे सभापती झाले. २००९ मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून चव्हाण यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. २०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले. तसेच आताच्या निवडणुकीत महायुतीने कोकण पट्ट्यात ३९ पैकी३५ जागा जिंकल्या. यात रवींद्र चव्हाण यांची महत्वाची भूमिका होती. कारण कोकणातील सगळी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. दरम्यान २०२२ मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. २०२२ मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला होता.

भाजपचे शिर्डी येथे १२ जानेवारी रोजी महाअधिवेशन पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील तब्बल १० हजारांहून अधिक भाजप पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची घोषणा यावेळी करण्यात येणार आहे.









