बोपदेव घाट गँगरेप प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश ;अखेर तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणी एका आरोपीला वारजेतून अटक करण्यात आली आहे, तर उरलेल्या दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून तिघांपैकी दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळतेय.

हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचं एक सीसाटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. या फुटेजमध्ये पीडितेच्या मित्रानं आरोपींना ओळखलं आणि त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अख्तर, सोम्या आणि चंद्रशेखर अशी या तिन्ही आरोपींची नावं आहेत. बोपदेवमध्ये तरुणीवर अत्याचार केलेले तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. या तिघांवर याआधीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर यातल्या एकावर याआधीही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या आरोपींनी २० किमी अंतरासाठी ८० किमीपेक्षा जास्त प्रवास केला.

बोपदेव प्रकरणातले तीनही आरोपी हे मध्य प्रदेशचे असून मागच्या काही वर्षांपासून पुण्यात कचरा वेचण्याचं काम करतात. बोपदेव घाटातल्या घटनेच्या रात्री तिन्ही आरोपींनी येवलेवाडीतल्या बिअर शॉपमधून बिअर विकत घेतली होती. बिअर प्यायल्यानंतर तिन्ही आरोपी बोपदेव घाटात गेले आणि पीडित मुलीवर अत्याचार केले. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ते बोपदेव घाटातून खाली उतरले. घाट उतरल्यानंतर तिन्ही आरोपी खेड शिवापूरला गेले. पोलिसांना चकवा देण्यासाठी तिघांनी वेगळा मार्ग घेतला आणि ते रात्रभर फिरत राहिले. या दरम्यानच्या काळात त्यांनी मोबाईलचाही वापर केला नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला, तसंच ७०० ठिकाणचे सीसीटीव्हीही पोलिसांनी तपासले.