बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश ; मुंबईतून आणखी ५ आरोपींना अटक, आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक

जित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आणखी पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.नवी मुंबई, कर्जत आणि पनवेल परिसरातून पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याआधी अटक करण्यात आलेले चार आरोपी २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली होती. ते आरोपींचा शोध घेत आहेत. याच दरम्यान, शुक्रवारी त्यांना मोठं यश मिळालं आहे. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, झिशान सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, सलमान खानच्या हत्येचं प्लॅनिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सुखवीर उर्फ ​​सुक्खाला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पानिपत येथून त्याला अटक करण्यात आली होती.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्या तीन सिक्योरिटी गार्ड्सचे जबाब नोंदवले आहेत. बाबा सिद्दिकी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेला २+१ म्हणतात, म्हणजेच दिवसा दोन आणि रात्री एक सिक्योरिटी गार्ड त्यांच्यासोबत असायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी त्यांच्यासोबत एकच सिक्योरिटी गार्ड होता. त्यावेळी त्या सिक्योरिटी गार्डने प्रत्युत्तर दिलं नाही. कारण त्याच्या डोळ्यात मिरचीसारखं काहीतरी अचानक गेलं आणि त्यामुळे तो तेव्हा काहीच करू शकला नाही, असा सिक्योरिटी गार्डने दावा केला आहे.