
एका आठवड्यात सोने इतक्या हजारांनी वाढले, चांदीनेही खाल्ला भाव, आगामी काळातही भाव वाढणार?

मुंबई – देशात सोन्याचे दर सातत्याने वाढत असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली. यंदा सोन्याचे भाव प्रतितोळा जवळपास लाखांच्या घरात आहेत. तर चांदीचे भाव जवळपास ३ हजारांनी मागील सात दिवसांत कमी झाले आहेत.

गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत १ हजार ४२० रुपयांनी वाढले आहेत. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम ₹१,०१,५०० वर पोहोचला आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा दर १३०० रुपयांनी वाढून ९३ हजार ५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १ हजार ३५० रुपये आणि २२ कॅरेटचा दर ९२ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. या आठवड्यात चांदीच्या किमती ३ हजार रुपयांनी घसरल्या आहेत. ३ ऑगस्ट रोजी म्हणजे आज चांदीची किंमत १ लाख १३ हजार रुपये प्रति किलो नोंदवली गेली. जळगाव सराफ बाजारात शनिवारी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात १३०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर ९९,८०० (जीएसटीसह १०२७९४) रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा दर ११९२ रुपयांनी वाढून विनाजीएसटी ९१४८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दरही महागला आहे. चांदी दरात १००० रुपयांची वाढ झाली. दरम्यान २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
आगामी सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी दरात वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. सध्या देशांतर्गत आणि जागतिक अनिश्चितता, डॉलरमधील चढउतार आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या ट्रेंडमुळे सोनेचांदीत वाढ दिसून आली आहे. आगामी काळातही सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.









