छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाकाबंदीवेळी पोलिसांनी सोनं-चांदीने भरलेली गाडी जप्त केली आहे. या गाडीमध्ये तब्बल १९ कोटी रुपयांच्या किंमतीचे सोनं-चांदी असल्याचं समोर आलेय. सोन्याची ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून चौकशी सुरु आहे. गाडी कुणाची आहे? सोनं कुणाचं आहे, याबाबत चौकशी सुरु आहे.
सिल्लोड येथील निवडणूक तपासणी पथकाने संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून जवळपास १९ कोटी रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर करण्यात आली. सिल्लोड येथील स्थिर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली. तेव्हा पथकाला यात सोन्या चांदीचे १९ कोटी रुपयांचे दागिने सापडले.
सिल्लोडमध्ये जप्त करण्यात आलेले हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती गटविकास अधिकारी आहिरे यांनी दिली. हे दागिने स्थिर पथकाने जप्त करून जीएसटी पथकाच्या स्वाधीन केले आहे. हे दागिने कोणत्या ज्वेलर्सचे आहे, कोठे नेले जात होते, त्याचे पक्के बिल होते का, याची माहिती मिळू शकली नाही. पथकाने हे वाहन निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्या ताब्यात दिले.