मोठी बातमी! छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?

नाशिक – महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्ष नेतृत्वावर नाराज झाले आहेत. त्यांनी अजितदादा पवार आणि पटेल यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ हे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये आले आहेत. आता त्यांनी समर्थकांशी चर्चा करुन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय खळबळ उडण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यावरून अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर आंदोलनही करण्यात आले होते. दरम्यान आज समर्थकांसोबतच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी भाजपात प्रवेश करावा, असा आग्रह ओबीसी नेत्यांनी केला आहे. भुजबळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून अजित पवार यांनी ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप ही केला आहे. ओबीसी समाज अजित पवार यांना कधीही माफ करणार नाही अशी बॅनरबाजी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ लागली आहे. महत्वाचे म्हणजे समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ आक्रमक झाल्याने अजित पवार त्यांना मंत्रीपद देणार की नाही हे पाहण्याबरोबरच सभेतील भुजबळ यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आपल्याला लोकसभेला दिलेला शब्द अजित पवार यांनी पाळला नाही असा दावा भुजबळ यांनी केला होता. तर विधानसभेला निवडून आल्यानंतर राज्यसभेबाबत विचारणा झाली होती, असेही भुजबळ म्हणाले होते.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखलं जातं. येवला विधानसभा मतदारसंघातून भुजबळ हे तब्बल ७ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. १९९९ पासून त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं आहे.