मोठी बातमी! भाजपा आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

नागपूर- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी बीड आणि परभणी घटनेच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे. पण याच दरम्यान राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याचे संकेत मिळण्याची शक्यता असणारी घटना घडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे शिंदे आणि पवार गटात अस्वस्थता पसरली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पाठोपाठ त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असून ही केवळ सदिच्छा भेट होती. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसे आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस असा मोठा संघर्ष दिसून आला आहे. त्यामुळे या भेटीला अधिकच महत्व तयार झाले आहे. दरम्यान त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे, तसेच शिंदे गटातील काही नेत्यांनी या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. महत्वाचे म्हणजे शिंदे गटातील अनेक नेते मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज आहेत, त्यात ठाकरे फडणवीस भेटीमुळे शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. या शपथविधीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातील इतर काही नेत्यांनी शपथविधीला हजेरी लावली नव्हती.