
‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय, ४०० उड्डाने रद्द, पहा कोणते विमानतळ राहणार बंद?

दिल्ली – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर गुरुवारी सुमारे ४३० नागरी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही देशातील एकूण शेड्यूल उड्डाणांची सुमारे ३ टक्के उड्डाणे आहेत. यासोबतच २७ विमानतळ १० मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेचा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षामुळे अनेक विमानतळांवरील कामकाज थांबविण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर विमानाने प्रवास करणार असाल किंवा तिकीट बुक करणार असाल तर प्रथम तुमचे विमानतळ सुरू राहणार आहे की नाही याची खात्री करावी लागणार आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमध्ये पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेचा उपाय म्हणून, देशभरातील २७ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. ही विमानतळे शनिवारी १० मेपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचबरोबर सिंदूर ऑपरेशननंतर इंदिरा गांधी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील उड्डाणे देखील आज पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
हे विमानतळ असणार बंद
चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगढ, पटियाला, शिमला, गग्गल, बठिंडा, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, हलवारा, पठाणकोट, लेह, जम्मू, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केशोड, भुज, धर्मशाळा, ग्वाल्हेर, हिंडन (गाझियाबाद)









