१ कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक अखेर गजाआड, बघा नेमक घडलंय काय ?

बीड : १ कोटी रूपयांची लाच मागणारा आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे गुरूवारी सकाळीच बीडच्या लाचलुचपत विभागासमोर शरण आला. त्याच्या अटकेची कारवाई सुरू हाेती. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याचा सहकारी असलेला सहायक फौजदार आर.बी.जाधवर हा अजूनही फरारच आहे.

जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून १ कोटी रूपयांची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. याप्रकरणी जाधवरसह खासगी इसम कुशल जैन याच्याविरोधात १५ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. १ कोटी पैकी पाच लाख रूपये घेताना जैनला ताब्यात घेतले होते. तर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार होते. खाडेच्या घरात १ कोटी ८ लाखांची रोकड, किलोभर सोने आणि साडे पाच किलो चांदी सापडली होती. तर जाधवरच्या घरातही पावकिलो साेने सापडले होते.

त्यांच्या शोधासाठी एसीबीने पथकेही नियूक्त केली होती. परंतू त्यांना पकडण्यात यश आले नाही. आता आठवडाभर धावपळ करून खाडे हा गुरूवारी एसीबीसमाेर शरण आला. जाधवर मात्र, अजूनही फरार असून तो देखील शरण येण्याची शक्यता आहे.