
दोन टप्प्यात होणार निवडणूक या तारखेला जाहीर होणार निकाल, एनडीए आणि इंडिया आघाडीत फुटणार दिवाळीचे फटाके

दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहार निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यातं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

निवडणूक आयोग तारखांची अधिकृत घोषणा आणि किती टप्प्यात निवडणूक होतील याबाबत सविस्तर माहिती देतील. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचं शुद्धिकरण अर्थात एसआयआर योजना राबवली, ३० सप्टेंबर २०२५ रोजी याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली, अशी माहिती यावेळी आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली. या एसआयआर प्रक्रियेद्वारे पात्र मतदार यादीतून बाहेर राहता कामा नये तसंच अपात्र मतदार यादीत येता कामा नये याची काळजी घेण्यात आल्याचंही सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवडणूक आयोगाच्या टीमने बिहारचा तीन दिवसांचा दौरा केला होता. त्यांनी पाटण्यातील सर्व १२ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची भेट घेऊन राज्याच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. दरम्यान, २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणूक घेण्यात आली होती. कोरानाच्या काळामध्ये ही निवडणूक झाली होती. तीन टप्प्यात ही निवडणूक झाली होती. कोरोनामुळे त्यावेळी अनेक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. पण यंदा त्या नसणार आहेत.
२०२० मध्ये बिहार निवडणुका तीन टप्प्यात झाल्या. २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. यापूर्वी २०१५ मध्ये पाच टप्प्यात मतदान झाले. १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निकाल ८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले.









