मोठी बातमी! प्रजासत्ताक दिनाची शाळांची सुट्टी रद्द !

मुंबई – राज्यासह संपूर्ण देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना आणि सरकारी कार्यालयांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मात्र, यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसे परिपत्रक सरकारने प्रसारित केले आहे.

विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यंमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेत ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन आणि देशभक्तीपर गीत गायन करणे. तसेच शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी, स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांकरिता भाषण स्पर्धा, स्वरचित किंवा इतर कवींनी लिहिलेत्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे, देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहनही राज्य शासनाने केले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करणे आणि त्यांनी तयार केलेल्या हस्तकला आणि चित्रकलांची प्रदर्शनी आयोजित करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हे सगळे उपक्रम आयोजित करत असताना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करण्यात यावा. तसेच सगळीकडे नियमांचे पालन होईल याकडे प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षक निरीक्षकांनी काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनी सकाळी झंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही. तर शाळेत विविध कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल, असा शालेय विभागाचा आणि राज्य शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे २६ तारखेला सर्व शाळा गजबजलेल्या दिसून येणार आहेत.