महायुतीत एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? यावरून बरीच चर्चा सुरू होती. निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं पूर्णपणे समर्थन आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.सरकार बनविताना आमची कुठलीही अडचण होणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना बोलल्याचं शिंदेंनी सांगितलं. तसेच, राज्यात राहणार का? केंद्रात जाणार? याबद्दलही शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते ठाणे येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत होते.एकनाथ शिंदे म्हणाले, “मंगळवारी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांना सांगितलं, ‘सरकार बनविताना आमचा कुठलाही अडथळा नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल, त्या आमची मान्यता आहे.’ त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा आहे.
”“गुरूवारी गृहमंत्री शहा यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर महायुती सरकार स्थापन होईल,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.यावेळी एका पत्रकारनं तुम्ही राज्यात राहणार की केंद्रात जाणार? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे, तू मला तिकडे का पाठवत आहेस?”“मी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. जेव्हा आम्ही सरकार बदललं, तेव्हा पंतप्रधान मोदींनी म्हटलं, ‘आम्ही तुमच्या पाठीशी राहू.’ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. त्यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना धन्यवाद देतो,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.