
मोबाईल नेटवर्क कंपन्यांचा ग्राहकांना मोठा दणका, वर्षभरात पुन्हा एकदा दरवाढीचा निर्णय, यामुळे महागणार रिचार्ज?

दिल्ली – मोबाईल नेटवर्क कंपन्या ग्राहकांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण लवकरच मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर १०-१२ टक्के महाग होऊ शकतात. जिओ आणि एअरटेल आणि सर्वच प्रमुख कंपन्या ही दरवाढ करण्याची शक्यता आहे.

यूजरची संख्या वाढल्यामुळे कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. मे महिन्यात मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांना विश्वास मिळाला आहे की ग्राहक आता महागडे प्लॅन देखील घेऊ शकतात. त्यामुळेच कंपन्या रिचार्ज प्लॅन वाढवण्याची तयारी करत आहेत. जुलै २०२४ मध्ये किमती वाढवल्या गेल्या होत्या, तेव्हा बेसिक प्लॅनमध्ये ११-२३% वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा तेवढ्यात पटीत ही दरवाढ केली जाणार आहे. एकट्या मे महिन्यात कंपन्यांचे ७४ लाख अॅक्टीव्ह युजर्स वाढले. गेल्या २९ महिन्यांत ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. यामुळे देशात अॅक्टीव्ह युजर्सची संख्या १०८ कोटी झाली आहे. जी मागील २९ महिन्यांतील सर्वोच्च आकडेवारी आहे. गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबरमध्ये २.१ कोटी युजर कमी झाले होते. परंतू, गेल्या पाच महिन्यांपासून वाढ होऊ लागली आहे. यामध्ये रिलायन्स जिओने ५.५ दशलक्ष सक्रिय ग्राहकांची वाढ नोंदवून आपला बाजारातील हिस्सा ५३% पर्यंत नेला, तर भारती एअरटेलने १ ३ दशलक्ष नवीन सक्रिय ग्राहक जोडले गेले आहेत. त्यांचा वाटा ३६ टक्के आहे. टेलिकॉम कंपन्या प्रामुख्याने प्रीमियम आणि जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. तर दुसरा एक मार्ग वापरत रिचार्ज दर स्थिर ठेवत डेटा मर्यादा कमी करून ग्राहकांना अतिरिक्त डेटा पॅक घेण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. त्यांना याची हळू हळू सवय लावायची आहे, या डेटा पॅक्सवर लोक येऊ लागले की ते महाग केले जातील आणि कंपन्या त्यातूनही पैसे छापतील, असा अंदज वर्तवण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे दूरसंचार कंपन्यांनी मागील वर्षी मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले होते. आता कंपन्यांनी पुन्हा दर वाढवले तर ग्राहक नंबर पोर्ट करु शकतात, असे म्हटले जात आहे.
जिओ आणि एअरटेल सारख्या मोठ्या ऑपरेटर्सचे यूजर वाढले आहे. यामुळे या कंपन्यांना रिचार्ज प्लॅन पुन्हा महाग करण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, व्होडाफोन आयडिया सतत यांचे यूजर कमी होत चालले आहे. त्यामुळे हे देखील दरवाढ होण्याचे कारण असू शकते.









