
सोन्याचा दरात विक्रमी वाढ, चांदीही वधारली, विक्रमी भाववाढीचे कारण काय?

मुंबई – सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रचंड वाढत चालले आहेत. सोन्याच्या किमतीत अवघ्या पाच दिवसांत ५ हजार ८०० रुपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्यासाठी आता १ लाख ३ हजार ४३० रुपये मोजावे लागत आहेत. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १० ऑगस्ट २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १०२,०९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९३,५८३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ११५,३८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,१५४ रुपये आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १०१,९०० रुपये आहे. तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९३,४०८ रुपये आहे. टॅरिफच्या निर्णयानंतर जागतिक बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर गेले. COMEX बाजारात फ्युचर्स ४६ डॉलर्सने वाढून ३४९९.८० डॉलर्स प्रति औंस झाले. भारतामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने १,०१,९७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. २०२५ मध्ये आतापर्यंत भारतीय सोन्याने गुंतवणूकदारांना ३३% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. काही जाणकारांच्या मते पुढील एका महिन्यात सोन्याचे दर १५० डॉलर्सने उंचावून ३६४०-३६५० डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे भारतातही सोन्याचे भाव १०,००० रुपयांनी वाढू शकतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांतर्गत अमेरिकेने स्वित्झर्लंडमधून आयात होणाऱ्या एक किलो व १०० औंस सोन्याच्या बार्सवर मोठा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून भारतातही भाव उसळण्याची शक्यता आहे.









