मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरले?

नागपूर – राज्यात नवनिर्वाचित फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपधविधी रविवारी पार पडला महायुतीतील ३९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. पण अद्यापही खाते वाटप जाहीर न झाल्यामुळे सगळे बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे विरोधकही सरकारवर टिका करत आहेत. पण आता खाते वाटप निश्चित झाले असून त्याची लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला मोठे यश मिळाले. पण घवघवीत यशानंतरही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार यासाठी महायुतीत बराच खल झाला होता. पण अखेर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बराच खाते वाटपाचा तिढा न सुटल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर तोही विस्तार रविवारी पार पडला पण अजूनही खाते वाटल रखडले असल्यामुळे कारभार ठप्प आहेत, तर शपथ घेतलेले मंत्री खाते वाटपाची वाट पाहत आहेत. पण कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अर्थात खाते वाटपात महत्वाची खाती भाजपाने स्वतः कडे ठेवली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत. गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार, आहेत. गृहखात भाजपकडे, नगरविकास शिवसेनेकडे, तर अजित पवार गटाला अर्थ खाते मिळणार आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपला, तर शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते राष्ट्रवादीला दिले जाणार आहे. भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात दिले जाणार आहे. महिला व बालविकास खाते हे ऱाष्ट्रवादीकडेच राहणार आहे. खाते वाटप झाल्यानंतर पुर्ण मंत्रिमंडळ सक्षमपणे काम करणार आहे.

शिवसेनेच्या खात्यांची यादी मुख्यमंत्र्यांना पोहचल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीची यादी आज दिली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना संपूर्ण खाते वाटप यादी देणार असल्याचे बोलले जात आहे.