मागील पाच वर्षापासून जनसेवा क्लिनिक या नावाने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने कदमवाकवस्ती परिसरात पांडवदंड येथे दवाखाना सुरु केला होता. जनसेवा क्लिनिक या नावाने बोगस दवाखाना थाटून नागरिकांना लुटणाऱ्या बोगस डॉक्टरवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुरुवारी दि.११ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश रंगनाथ तोरणे असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. रुपाली रघुनाथराव भंगाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रुपाली भंगाळे या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. डॉ. भंगाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करत असताना हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांचा फोन आला. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावर प्रकार तोरणे याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहीत्य व औषध गोळ्या विनापरवाना बाळगून आहे. स्वत: डॉक्टर असल्याची बतावणी करुन नागरिकांना जनसेवा क्लिनिक या दवाखान्यात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी विस्तार अधिकारी डॉ. महेश वाघमारे, डॉ. रुपाली भंगाळे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मनोज उबरे हे लोणी काळभोर पोलिसांनी घेऊन त्या ठिकाणी गेले. प्रकाश तोरणे यांना डॉक्टर असल्याबाबत व औषध-गोळ्या विक्रीबाबत महाराष्ट्र कौंसिल ऑफ मेडीसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. त्यावेळी तोरणे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचे कोणतीही शैक्षणीक पात्रता अथवा पदवी नसल्याचे समोर आले. तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याचे त्याने कबुली दिली.
त्यानंतर त्याच्याकडील वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषध गोळ्या जप्त केल्या. तसेच दवाखाना सील केला. आरोपी मागील पाच वर्षापासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी तोरणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.