विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आतापर्यंत १४६ जागांवर उमेदवार जाहीर केलेत. त्यानंतर आता भाजपाने ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्याचं समोर आले आहे. बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी मतदारसंघ भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांना सोडले आहेत.त्यामुळे महायुतीत भाजपाच्या जागांची संख्या आता १५० इतक्या झाल्या आहेत.
माहितीनुसार, बडनेरा ही जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली आहे. तर गंगाखेड महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली आहे. कलिना जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडली आहे. शाहूवाडी मतदारसंघ हा विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला सोडली आहे. अशाप्रकारे ४ जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्ष हा २०१४ च्या आधीपासून भाजपासोबत महायुतीमध्ये होता. अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले तर जानकर महायुतीसोबत कायम होते.
लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता रासपला विधानसभेची एक जागा सोडल्यामुळे महादेव जानकर पुन्हा महायुतीत परतणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, महायुतीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला २ जागा सोडण्यात आल्याची माहिती आहे. त्यात भाजपाने कलिना मतदारसंघ तर शिवसेना शिंदे गटाकडून धारावी मतदारसंघ सोडण्यात आलेली आहे. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. विधानसभेच्या २ जागांसह भविष्यात काही महामंडळेही देण्याचं आश्वासन रामदास आठवलेंना महायुतीकडून देण्यात आले आहे.