
रिजर्व बँकेकडून पतधोरण जाहीर, व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा बैठकीत काय ठरले?

मुंबई – रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज पार पडली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी रेपो दरात कोणताही बदल केला नसल्याची माहिती दिली.

यावेळीही रेपो दर ५.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलेला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी ते जून या कालावधीत सातत्याने रेपो दरात कपात केली होती. तीन बैठकांमध्ये, रिझर्व्ह बँकेनं रेपो दर १% नं कमी केला. परंतु, ऑगस्टच्या बैठकीत, आरबीआयन रेपो दर ५.५% वर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रेपो दर स्थिर ठेवण्याव्यतिरिक्त, आरबीआयनं एसडीएफ दर ५.२५% आणि एमएसएफ दर ५.७५% वर कायम ठेवला आहे. एमपीसीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याच्या बाजूनं मतदान केल्याचंही संजय मल्होत्रा म्हणाले आहेत. रेपो दरात बदल न झाल्यामुळे होम लोन आणि कार लोनचे हप्ते तसेच राहणार आहेत. ज्यांनी आधीपासून लोन काढले आहे किंवा नवे लोन घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. मात्र, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर RBI ने कोणताही दिलासा नाही. त्यामुळे ग्राहकांना या दिवाळीत खर्चाचे बजेट सांभाळावे लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करून सर्वसामान्यांना आणखी एक मोठा दिलासा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेट तसाच कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना तुर्तास ईएमआयमध्ये दिलासा मिळण्यास वाट पाहावी लागणार आहे.
चांगल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पहिल्या तिमाहीत विकास दर चांगला राहिला आहे. पतधोरण आढावा समितीने चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी विकास दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.









