
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी सायंकाळी अचानक धुळीचे वादळ आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात अपघातांची मालिका घडली. घाटकोपर परिसरातील छेडा नगरात होर्डिंग कोसळून भीषण अपघात घडला असून या ठिकाणी पेट्रोल पंपावर वाट पाऊस थांबण्याची वाट पाहणारे शंभरहून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे बचावासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफ ( NDRF ) बचावाचे काम रात्रभर चालणार आहे. आतापर्यंत ढीगाऱ्या खालून 35 हून अधिक नागरिकांना ढीगाऱ्या खालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमीची रवानगी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात करण्यात आली आहे.

मुंबई महानगरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास धुळीच्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी झाली. मुंबईकर आपआपल्या दैनंदित व्यवहारात व्यस्त असाताना अचानक कोसळलेल्या पावसाने घाटकोपर येथील होर्डींग कोसळून त्यांच्या खाली अनेक वाहने अडकली. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारासअचानक वादळ आणि मुसळधार पावसामुळे रेल्वे पेट्रोल पंप, समता कॉलनी, घाटकोपर (पू) येथील समता कॉलनीच्या रेल्वे पेट्रोल पंपावर 70/50 मीटर आकाराचे भलेमोठ्या होर्डिंगचा मेटल गर्डर अचानक कोसळला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. दरम्यान, मुंबई महानगर पालिकेने या प्रकरणी रेल्वे आणि जाहीरात कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.

पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी या पेट्रोल पंपावर असतानाच अचानक हे भले मोठे जाहीरातीचे होर्डींग कोसळल्याने अनेक जण या ढीगाऱ्याखाली वाहनांसकट अडकले. पावसाने आडोशाला उभे असलेले नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघातानंतर येथील ढीगाऱ्यातून 37 जणांना बाहेर काढले आहे. आणखी 50 ते 60 जण ढीगाऱ्याच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या पथकांना मदतीला बोलावले आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदेश जारी केले आहे. अपघातग्रस्तांना आवश्यक मदत मिळावी यासाठी उपाययोजना करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी स्वत: महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.









