मावळ तालुक्यात अजित पवार गटाला मोठा धक्का..! बड्या नेत्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रामराम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांची नाराजीही समोर आली आहे.

सुनील शेळके यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेले बापूसाहेब भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बापूसाहेब भेगडे यांनी आपण पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून तसा इमेल वरिष्ठांना करत असल्याचे सांगितले. यासह कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण मावळ विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचेही भेगडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

यानंतर आता त्यांच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातून इच्छुक असलेले बापू भेगडे यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती मिळत आहे. यादी जाहीर झाल्यानंतर बापू भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रामराम केला. त्यामुळे आता अजित पवार यांना मावळ तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. दरम्यान मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे, अशी लढत होणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.