
पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा, शंभूराज देसाईंचे आवाहन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

मुंबई – भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत ०९ जून २०२५ पासून सुरू होत आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.









