सावधान! गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा…

हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, ‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट तर ‘या’ ठिकाणी अवकाळी पाऊस

पुणे – भारतीय हवामान खात्याने देशभरातील विविध भागांमध्ये आगामी सात दिवसांत उष्णतेच्या लाटेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये सूर्याचा प्रखर तडाखा असेल, तर काही भागांत विजांचा कडकडाट आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशात वातावरणात मोठे फेरबदल होणार आहेत. मध्य महाराष्ट्रात २४ आणि २५ एप्रिलला पावसाची शक्यता असून गुजरातमध्ये २२ ते २४ एप्रिलदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे रविवारी तापमान ४४.६ अंश सेल्सियसवर पोहोचले, जे देशातील सर्वात जास्त तापमान होते. याशिवाय, बिहारमधील अनेक भागांत २३ ते २६ एप्रिलदरम्यान रात्रीचे तापमानही अधिक राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये २२ ते २६ एप्रिलदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांत २३ एप्रिल रोजी जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच उद्या अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्टही देण्यात आला. तसेच विदर्भातील आणखी काही भागात पुढील ३ दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. अकोला जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आज तसेच शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. सोलापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस, सांगली जिल्ह्यात आज आणि उद्या, सातारा, नगर तसेच पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. कोकणातही उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आज, उद्या आणि रविवारी हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला. सांगली जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार, सोलापूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार, बीड जिल्ह्यात शनिवारी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे.