केंद्र सरकारमुळे बीसीसीआय-ड्रीम11 करार संपुष्टात!

आता ही कंपनी असेल टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सर? पण या कारणामुळे टीम आशिया कपमध्ये प्रायोजकाविना?

मुंबई – बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यातील तब्बल ३५८ कोटींचा प्रमुख प्रायोजकाचा करार वेळेआधीच संपुष्टात आला आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या ऑनलाईन गेमिंग विधेयकामुळे ड्रीम-11च्या व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. याच कारणामुळे कंपनीने करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडीयासाठी नवीन प्रायोजक शोधावा लागणार आहे.

ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या ‘ड्रीम11’ ने भारतीय संघाच्या जर्सीचा प्रायोजक म्हणून ३५८ कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र, आता त्यांनी हा करार रद्द केला आहे. भारतात ऑनलाइन गेमिंगवर लागू झालेल्या नवीन कायद्यांमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. या कायद्यामुळे ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींवर मोठे निर्बंध आले आहेत. ड्रीम11 कंपनीने २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी हा करार केला होता, परंतु आता तो मुदतीपूर्वीच संपुष्टात आला आहे. आता आशिया कप २०२५ च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय नव्या प्रायोजकाच्या शोधाला गती देण्याची शक्यता आहे. नव्या प्रायोजकाच्या निवडीबाबत बोर्ड लवकरच ठोस निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. जपानमधील टोयोटा या ऑटोमोबाईल कंपनीने टीम इंडियासोबत प्रायोजकत्व करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतात ही कंपनी टोयोटा किर्लोस्करने कार्यरत असून मागील आर्थिक वर्षात तिने ५६,५०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. टोयोटाशिवाय आणखी एक मोठी फिन-टेक कंपनी देखील टीम इंडियाशी जोडण्याची इच्छा व्यक्त करत आहे, मात्र तिचं नाव अद्याप समोर आलेले नाही. आता बीसीसीआय कोणत्या कंपनीशी करार करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पुढील महिन्यात म्हणजे ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या अवघ्या दोन आठवडे आधीच करार रद्द झाल्याने आशिया कपमध्ये टीम इंडिया कदाचित प्रायोजकाविना मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे. हे टाळण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.