
राज्य सरकारचा गणेशभक्तांना मोठा दिलासा, विशेष टोलमाफी पास वितरीत होणार, कसा मिळणार पास

मुंबई – यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने एक विशेष पास योजना राबवली आहे. यामध्ये ‘गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टिकर्स स्वरूपाचे पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर वाहन क्रमांक व चालकाचे नाव नमूद करण्यात येणार असून हे पास परतीच्या प्रवासासाठीही वैध असतील. या पासेसचे वितरण परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालये यांच्या समन्वयातून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आरटिओ कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस यांनाही या माफीचा लाभ मिळणार आहे. विविध जिल्ह्यांमधून कोकणात जाणाऱ्या बसेसना संबंधित पोलिस किंवा आर.टी.ओ. कार्यालयाकडून हे पास वितरित करण्यात येतील. हे पास बसेसवर लावूनच त्या मार्गस्थ केल्या जातील. या टोलपासेसच्या संख्येची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप सचिव यांना सादर करावी लागणार आहे. तसेच पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा व त्यांची उपलब्धता याबाबत अधिसूचना वा जाहिरातीद्वारे जनतेला माहिती द्यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक कोकणात जाणार असल्याने टोलमाफीचा निर्णय त्यांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या व प्रवासाचा खर्च विचारात घेणाऱ्या लाखो गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. गणपतीच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीला शिस्तबद्ध वाहतूक आणि टोल माफीमुळे एक सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.









