
शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे पायी चाललेल्या एका महिलेचा अंधाराचा फायदा घेऊन विनयभंग करत तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात दत्तात्रय भिकोबा हरगुडे, शारदा दत्तात्रय हरगुडे आणि कोमल प्रवीण दरेकर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणसवाडी येथून पीडित महिला रात्री नऊच्या सुमारास पायी चालत असताना अंधारामध्ये दत्तात्रय हरगुडे याने तिला आवाज देत, माझ्या पायाला काहीतरी लागले आहे. काय झाले बघ? असे म्हटले. आरोपी जेष्ठ असल्याने पीडित महिलेने मदतीच्या हेतूने त्याचा पाय पाहत असताना, दत्तात्रय याने महिलेला पकडले. महिला प्रतिकार करू लागल्याने त्याने तिला मारहाण केली.

महिला त्याच्या तावडीतून सुटून पळून जात असताना दत्तात्रय याची पत्नी व मुलगी तेथे आल्या. त्यांनीही महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दत्तात्रय भिकोबा हरगुडे, शारदा दत्तात्रय हरगुडे व कोमल प्रवीण दरेकर (सर्व रा. सणसवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राकेश मळेकर करत आहेत.










