पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द..बघा नेमक काय घडल…?

कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन बाल हक्क मंडळाने रद्द केला असून त्याची रवानगी आता बालसुधारगृहात होणार आहे. दोन जणांचे जीव घेतल्यानंतरही केवळ निबंध लिहायला सांगून त्याला बाल हक्क मंडळाने जामीन दिलेला होता. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण होते. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर आज बाल हक्क मंडळाने आज अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करताना त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याचे आदेश दिले.

आरोपी वेदांत अगरवाल याला आज बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. तसेच, त्याच्यावर लावलेल्या गुन्ह्याच्या कलमातही वाढ करण्यात आली आहे. दारु पिऊन कार चालवली असल्याने त्याच्यावर १८५ कलमांतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयाला विनंती अर्ज केला आहे की हा गुन्हा गंभीर असल्याने अल्पवयीन आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी. पोलिसांच्या या अर्जावर कोर्टात सुनावणी झाली. मात्र आरोपी सज्ञान आहे की नाही, हे पोलीस तपासानंतर ठरविणार आहेत.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा बिल्डर बाप विशाल अगरवाल याला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अगरवाल याच्यासहित तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाकडून विशाल अगरवाल याच्या सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अगरवाल याने अपघानंतर कोणाकोणाला फोन केले? त्याचे छत्रपती नगरला जाण्याचे कारण काय? त्याला तिथे कुणाला भेटायचे होते? अशा आणि अन्य तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी सरकारी पक्षाने पुणे सत्र न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने अगरवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.