बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर? ; पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वरच झाडली गोळी, नेमकं काय घडल ?

दलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काऊंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू आहे. एसआयटीकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते.

सकाळी ५.३० वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसाची प्रकृती गंभीर आहे.