इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डींना उमेदवारी

Oplus_131072

निवडणूक बिनविरोधची शक्यता मावळली, दक्षिणेतील पक्षांची अडचण, सीपी राधाकृष्णनांचे आव्हान

दिल्ली – भारतीय राजकारणात उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कारण येत्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने आपले उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर लगेचच मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराचे नाव जाहीर केले. या निवडणुकीत न्यायमूर्ती रेड्डी यांचा सामना सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत होणार आहे. बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून भाजपच्या आवाहनला विरोधकांनी नकार दिला आहे. बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. २ मे १९९५ ला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तर. ५ डिसेंबर २००५ ला गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित कायदेशीर कारकिर्दीमुळे त्यांना अनेकदा न्यायाचे आणि कायद्याचे कट्टर समर्थक मानले जाते. विरोधी पक्षांनी एका निवृत्त न्यायाधीशाला उमेदवारी देऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. इंडीया आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सुदर्शन रेड्डी यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. सर्व पक्षांच्या सहमतीने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे, असं काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले.आम आदमी पक्षाचीही सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला सहमती आहे, असं टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी सांगितले. ‘एनडीए’ने ज्याप्रकारे सी.पी. राधाकृष्णन यांना दक्षिण भारतीय असल्याचे पाहून उमेदवार केले आहे. त्याचप्रकारे इंडिया आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे ‘टीडीपी,’ ‘वाईआरएससीपी’ आणि ‘बीआरएस’सारख्या पक्षांना नेमके कुणाला पाठिेंबा द्यावा? याबद्दल विचार करावा लागणार आहे. ९ सप्टेंबरला मतदान होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे.