पुरस्कारप्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण

मुंबई – विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील १११ गुणवंत शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक केवळ पुस्तकातील धडा शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. आत्मविश्वास, संस्कार आणि प्रामाणिकपणाची बीजे त्यांच्या मनात पेरतात. शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कार वितरणाच्यावेळी दिलेल्या व्हीडिओ संदेशात केले. पवार यांनी बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज यावेळी अधोरेखित केली. पूर्वी साक्षर-अनाक्षर यावर भर होता, नंतर संगणक साक्षरतेचा काळ आला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग आहे. यामुळे प्रत्येकाने एआय साक्षर होणे, डिजिटल शिक्षण पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेल्या शिक्षकांचे कौतुक करुन अधिका‍धिक संख्येने शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवावा, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळा आता कात टाकत असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. शासनाने मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. भारत हा युवकांचा देश आहे. भारताला कौशल्ययुक्त युवकांचा देश बनवले तर एकही देश भारतीय मनुष्यबळाशिवाय काम करू शकणार नाही आणि जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून भारत पुढे येईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केले. भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल आणि देशांच्या या प्रगतीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शिक्ष‍क पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा कृतज्ञतेने उल्लेख करुन भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनाच्या दिवशीच (5 सप्टेंबर) पुरस्कार वितरण व्हावे, अशी सूचना त्यांनी शिक्षण विभागाला केली आहे.