भररस्त्यात हातात कोयता घेऊन लोकांना धमकावण्याचा प्रयत्न ; कोंढवा परिसरातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

शिवनेरीनगर येथील येथील गल्लीत रात्री खूप गर्दी झालेली पाहून पोलीस तेथे गेले. तेव्हा एक जण हातात कोयता घेऊन लोकांना धमकावित होता. पोलिसांना आलेले पाहून त्याच्या पत्नीने कोयता लपविला. पोलीस त्याला घेऊन जात असताना त्यांना अडवून हुज्जत घालून दोघे निघून गेले. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महेश विलास लोणकर (वय ३१) व त्यांची पत्नी असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार किरण झेंडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी मेमाणे हे बुधवारी रात्री आठ वाजता कोंढवा परिसरात गस्त घालत होते. शिवनेरीनगरमधील गल्ली नं.२७ येथे खूप गर्दी व ट्राफिक झाल्याचे पाहून ते पुढे गेले. तेव्हा एक जण हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करुन दमदाटी करुन धमकावण्याचा प्रयत्न करीत होता.

फिर्यादी व त्यांचे सहकारी मेमाणे हे त्याच्या जवळ जात असताना त्याच्या पत्नीने त्यांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन कोयता लपविला. महेश लोणकर याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने व त्याच्या पत्नीने आरेरावी करुन मोठ्या आवाजात हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.