लग्नाचे आमिष दाखवत केला अत्याचार ; जातीवरुन लग्नाला नकार, तरुणावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर घरचे खालच्या जातीची मुलगी सून नको असे म्हणत असल्याचे सांगून लग्नाला नकार देणार्‍या तरुणावर लोणीकंद पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी वाघोलीतील एका २३ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक संजय मगर (वय २३)याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते ७ एप्रिल २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मागासवर्गीस असल्याचे माहिती असूनही अभिषेक मगर याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तो दर दोन तीन महिन्यांची फिर्यादीला पैसे मागू लागला. पैसे कमी दिल्यास किंवा पैसे देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ व हाताने मारहाण करीत होता. तो फिर्यादी यांना आपल्या मुळ गावी घेऊन जात होता. गाडी रस्त्यात थांबवून तो फिर्यादीला म्हणाला की, आपल्या घरात खालच्या जातीची मुलगी सून नको, असे माझ्या घरच्यांनी सांगितले आहे. तरी ते तुला घरात घेणार नाही, तू इथुन निघून जा, असे म्हणत तिला गाडीतून ढकलून दिले. त्यानंतर फिर्यादी या पुण्यात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे तपास करीत आहेत.