
सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एका नावाचा प्रचंड धसका घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर समोर येत असलेल्या धक्कादायक खुलाश्यांनी राज्याच्या सत्ताकेंद्रात म्हणजेच ‘मंत्रालयात’ मोठी खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाचा रोख थेट विधानसभेत वळवल्याने आता या वादाला मोठी फोडणी मिळाली असून, नेत्यांपासून ते बड्या सनदी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच झोप उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने या प्रकरणाला अधिकच गंभीर बनवले आहे. खरात याच्या एका गंभीर वैद्यकीय अहवालाचा दावा केला जात असून, यामुळे राजकीय वातावरण तर तापलेच आहे, पण त्यासोबतच हजारो कुटुंबांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जरी या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली, तरी मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये होणाऱ्या दबक्या आवाजातील चर्चांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठे गूढ आता एका पेन ड्राईव्ह’ भोवती फिरत आहे. विजय वडेट्टीवार यांनी तपास यंत्रणांना थेट सवाल केला आहे की, “जर खरात याचे लॅपटॉप आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत, तर त्यातील पेन ड्राईव्ह सार्वजनिक का केला जात नाही?” या एका प्रश्नाने तपास यंत्रणांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्या पेन ड्राईव्हमध्ये नेमकी कोणत्या ‘शक्तिशाली’ लोकांची नावे, व्हिडिओ किंवा गुपिते दडलेली आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता आता संपूर्ण राज्याला लागली आहे.











