अशोक खरात वापरायचा ‘कोल्ड रिडिंग’ आणि ‘हॉट रिडिंग’ तंत्र

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण राज्यात गाजत आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आता एसआयटीने अशोक खरातच्या नाशिकमधील ओकस कार्यालात जात मोठी कारवाई केली आहे.

एसआयटीच्या पथकाने कार्यालयातील प्रिंटर आणि महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग प्राप्त झाला आहे. आता या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी अशोक खरात स्वतंत्र यंत्रणा राबवत होता. त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाबड्या ग्राहकांची आधीच माहिती मिळवत होता, यासाठी तो कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग या तंत्राचा वापर करत असायचा. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटांत ग्राहकांना अचूक माहिती सांगायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. ग्राहकाचे नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण? शत्रू कोण? जीवनातील काही चढ-उतार याबाबतीत माहिती जाणून घेण्याचा अशोक खरात प्रयत्न करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग म्हणजे काय?

हॉट रिडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते. तर कोल्ड रिडिंगमध्ये पाहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केले जाते. या तंत्राचा वापर करुन ग्राहकाचा विश्वास संपादन केला जातो. मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग करत होता. अशोक खरातचा मोबाईल जप्त करण्यात आला असून डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.