
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – विश्वजीतबरोबर का राहता, असे विचारुन आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उद्देश विलास शिंगारे (वय २७) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.शिंगारे यांच्यासह यश टारगे (वय १९) हा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही घटना वडगाव शेरी येथील माळवाडीमधील सत्यम सेरिनेटी सोसायटी येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंगारे त्यांचे मित्र यश टारगे, विश्वजीत पवार, सिद्धार्थ शेलार, सार्थक धुमाळ व लखन पवार हे गप्पा मारत होते. त्यावेळी चार ते पाच मोटारसायकलवरुन आठ ते दहा जण आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन विश्व्या कोठे आहे, असे विचारुन फिर्यादी यांना विश्वजीत बरोबर का राहतो, असे म्हणून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यांनी तो वाचविण्यासाठी हातमध्ये घातला असताना डाव्या हातावर कोयत्याच्या वाराने गंभीर जखमी केले.

फिर्यादी यांच्यावर आणखी वार करत असताना त्यांनी उजवा हातमध्ये घातला. तळहातावर तो वार बसला. फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर कोयता मारुन गंभीर जखमी केले. टोळक्यामधील एकाने यश टारगे याच्या पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. जाताना त्यांनी हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.









